अमरावती: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला धूळ चारणारे आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी एक हटके निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आंध्र प्रदेशला एक-दोन नव्हे तर पाच उपमुख्यमंत्री असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्री नेमण्यात आल्याची घटना घडली आहे. यापूर्वी चंद्राबाबू नायडू सरकारच्या काळात कापू आणि ओबीसी समाजातील प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. 


दरम्यान, वायएसआर काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत जगनमोहन रेड्डी यांनी लोकांच्या अपेक्षा ध्यानात ठेवून मंत्र्यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले. येत्या शनिवारी २५ मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. अडीच वर्षानंतर कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात खांदेपालट केला जाईल, असेही यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट केले. या सगळ्यांच्या कामगिरीवर आपली नजर असेल. आपल्याला वायएसआर काँग्रेस आणि यापूर्वीच्या सरकारमधील फरक जनतेला दाखवून द्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 



आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. या निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीचा दारूण पराभव केला. लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर वायएसआर काँग्रेसचा विजय झाला.