हैदराबाद : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेशात महिलांच्या सुरक्षततेबाबत ठोस पावले उचलली जात आहेत. बलात्कारानंतर पीडितेला ताबडतोब न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं नव्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाला 'एपी दिशा अधिनियम', असं नाव देण्यात आलं आहे. या विधेयकात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर दोषी आढळल्यास २१ दिवसांत शिक्षा होईल, अशीही तरतूद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादच्या घटनेनंतर आंध्रप्रदेश सरकारने महिलांच्या सुरक्षेबाबत तातडीने एक नवा कायदा आणण्याचा निर्णय़ घेतला आहे. कलम ३५४ मध्ये संशोधन करत यामध्ये नवीन ३५४ ई कायदा तयार करण्यात येणार आहे.


महिला आणि मुलींसोबत अत्याचार करणाऱ्या आणि शारीरिक शोषण करणाऱ्या लवकरात लवकर शिक्षा दिली जाणार आहे. यासाठी फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करत लगेचच निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये २१ दिवसात शिक्षा दिली जाणार आहे.


आंध्र प्रदेश सरकारच्या कॅबिनेटने बैठक घेत हा निर्णय घेतला. कॅबिनेटने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता हे विधेयक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे. हे विधेयक मंजूर झालं तर ७ दिवसाच्या आत पोलिसांनी चौकशी पूर्ण करुन १४ दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर २१ दिवसाच्या आत आरोपीला शिक्षा दिला जाणार आहे.


आतापर्यंत देशात अनेक असे गुन्हे घडले आहे. पण अनेक गुन्ह्यांमध्ये अजूनही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना अटक होऊनही त्यांना लवकर शिक्षा होत नाही. त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.