पणजी : स्मार्टफोनच्या आहारी गेल्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत. सेल्फीच्या नादात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सेल्फीने गोव्यात एका डॉक्टर तरुणीचा बेळी घेतला आहे. गोव्यातील कोलंबिया बीचवरील खडकावर उभे राहून डॉक्टर तरुणी सेल्फी घेत होती. सेल्फी काढण्याच्या नादात तिला भान राहिले नाही. त्याचवेळी मोठी लाट आली. या लाटेमुळे ती पाण्यात ओढली गेली आणि बुडाली. या बुडालेल्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तिच्या मैत्रिणीला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. डॉ. उत्तुरु राम्या कृष्णा (२५) असे या तरुणीचे नाव आहे. ती गोव्यात नोकरी करत होती. ती मूळची आंध्र प्रदेशची राहणारी आहे. डॉ. उत्तुरु राम्या कृष्णा हिने एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर जगगयपेटमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केले. २०१८ मध्ये ती कामासाठी गोवा येथे आली. मित्रांसोबत ती कोलंबिया बीचवर मौज मजा करण्यासाठी आली होती.


सेल्फी काढत असताना भरतीची वेळ होती. त्यामुळे पाण्याची पातळीही वाढत होती आणि लाटांचा वेगही वाढला होता. पण डॉ. उत्तुरु राम्या कृष्णा आणि तिची मैत्रिण सेल्फी घेण्यात मग्न होत्या. त्याचवेळी एक मोठी लाट आली आणि दोघींना पाण्यात घेऊन गेली. किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांना या दोघी पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत स्थानिकांना मदतीचे आवाहन केले. पण भरतीची वेळ असल्याने पाण्याला वेगही होता. यामुळे राम्या पाण्यात दूर फेकली गेली.


याठिकाणी गोवा राज्य सरकारने येथील २४ ठिकाणे नो सेल्फी झोन म्हणून घोषित केले आहेत. तसेच या बीचवर लाल झेंडेही लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.