अनिल अंबानींच्या ऐश्वर्याला उतरती कळा, संपत्ती घटली
एकेकाळी भारतीय कुबेर अशी अनिल अंबानी यांची ओळख होती.
मुंबई : एकेकाळी भारतीय कुबेर अशी अनिल अंबानी यांची ओळख होती. पण अनिल अंबानींच्या ऐश्वर्याला उतरती कळा लागली आहे. त्यांचे उद्योग व्यवसाय दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. २००८ साली जगातील अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेले अनिल अंबानी १० वर्षांत अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. २००८ मध्ये अनिल अंबानींकडे ४२ अब्ज डॉलरची संपत्ती होती.
जागतिक मंदीनंतर अनिल अंबानींच्या उद्योगाला घरघर लागली. रिलायन्सची टेलिकॉम क्षेत्रातली कंपनीही बुडाली. काही उद्योगात प्रचंड गुंतवणूक करूनही तोटा सहन करावा लागला. २०१८ मध्ये रिलायन्स समुहावर १.७ लाख कोटींचं कर्ज झालं. अनेक खटल्यांमुळे कंपनीचे प्रकल्प रखडले. त्यामुळे एकेकाळच्या कुबेराची कंगालीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
२००६ मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी या दोन भावांनी उद्योगात वाटणी केली. मुकेश यांच्या वाट्याला रिलायन्स इंडस्ट्रिज आली. तर रिलायन्स इन्फोकॉमची धुरा अनिल अंबानींनी सांभाळली. अनिल अंबानींच्या कंपन्या पायाभूत सुविधा, ऊर्जा, विमा, संरक्षण आणि सिनेमा क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांच्या या कंपन्यांना एकापाठोपाठ आर्थिक फटका बसला.
एरिक्सन खटल्यात अनिल अंबानींच्या दाव्याची रक्कम मुकेश अंबानींनी भरल्यानं त्यांची अटक टळली होती. अनिल अंबानींच्या औद्योगीक साम्राज्याचा सूर्य मावळतीला लागला आहे. यातून सावरणं अनिल अंबानींसाठी मोठं आव्हान असणार आहे.