राफेलच्या आरोपांवर अनिल अंबानींचं राहुल गांधींना उत्तर
राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केले होते गंभीर आरोप
नवी दिल्ली : राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उद्योगपती अनिल अंबांनींनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. फ्रान्सबरोबर राफेल फायटर विमानांचा खरेदी करार करताना स्थानिक भागीदार म्हणून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची निवड कशी झाली ? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. रिलायन्स समूह फायटर विमान निर्मितीच्या क्षेत्रात अनुभवहीन असल्याचा राहुल गांधींचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.
राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीने स्थानिक भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली. त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही असे त्यांनी म्हटले आहे. १२ डिसेंबर २०१७ रोजी अनिल अंबानी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून राफेल विमानांच्या कराराबद्दल खुलासा केला होता. गांधी कुटुंबाबरोबर आपल्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण काँग्रेस पक्षाकडून माझ्या कंपनीबद्दल जी विधाने केली जातायत त्याने आपल्याला व्यक्तीगत दु:ख झाले आहे असे अनिल अंबानी यांनी पत्रात म्हटले आहे.