अहमदाबाद: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बासी ईदच्या (बकरीद) दिवशी बकरी आणि मेंढ्यांना कुर्बानीपासून वाचवण्यासाठी सुरतमधील एका प्राणी हक्क संघटनेने अनोखे पाऊल उचलले आहे. त्यासाठी या संस्थेने सध्या सूरतमधील बाजारपेठेतून शक्य तितक्या बकऱ्या आणि मेंढ्या खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत या संस्थेकडून १०० बकऱ्या आणि मेंढ्या खरेदी करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही केवळ प्राण्यांविषयी जागरुकता निर्माण करत आहोत. त्यामुळे लोकांनी स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीला आमचा आक्षेप आहे, असे सर्वधर्म जीवदया समिती संस्थेकडून सांगण्यात आले. या सर्व बकऱ्या-मेंढ्यांना पशुनिवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरतमध्ये पशुनिवारा केंद्र चालवणाऱ्या राजीव शहा यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, आम्ही बकरीदच्या बरेच दिवस आधीपासून बकऱ्या आणि मेंढ्या खरेदी करायला सुरुवात करतो. या काळात त्यांच्या किंमती कमी असतात. आतापर्यंत आम्ही दीड लाख रुपये मोजून १५ ते २० हजार रुपये किंमतीच्या ९४ बकऱ्या-मेंढ्या विकत घेतल्या आहेत. यानंतर आम्ही आणखी एखाद्या शहरातील बाजारपेठेतून प्राण्यांची अशी खरेदी करू, असे शहा यांनी सांगितले.


मात्र, मुस्लिम समाजात संस्थेच्या या भूमिकेवषयी नाराजी आहे. या संस्थेकडून नेहमीच बकरीदला विरोध केला जातो. अशाप्रकारे बाजारपेठेतून बकऱ्या आणि मेंढ्यांची खरेदी केल्यास टंचाई निर्माण होईल. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारच्या चळवळींनी जोर धरल्यामुळे दारुल उलूमने मध्यंतरी एक फतवाही जारी केला होता. यामध्ये कोणीही प्राण्यांची कुर्बानी देतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नये, असे म्हटले होते.