पाटणा: चारा घोटाळ्यात तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाने त्यांची सर्व बेहिशेबी संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लालूंचा पाटणा विमानतळाजवळचा बंगला आणि नोटाबंदीच्या काळात बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांवर सरकारची टाच येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटणा विमानतळाजवळ फेयर ग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा बंगला आहे. बाजारभावानुसार या बंगल्याची किंमत जवळपास साडेतीन कोटी इतकी आहे. फेयर ग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तेजप्रताप यादव, तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुली संचालकपदावर होत्या. चौकशीदरम्यान ही कंपनी बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते. 


आयकर विभागाने गेल्यावर्षी केलेल्या कारवाईत हा बंगला सील केला होता. तसेच नोटाबंदीच्या काळात लालू प्रसाद यादव यांच्याकडून अवामी बँकेत मजूरांच्या नावाने खाती उघडून लाखो रुपये जमा करण्यात आले होते. 


तत्पूर्वी लालू प्रसाद यादव यांनी देवघर कोषागार घोटाळा प्रकरणात जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात लालूंना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आतापर्यंत लालूंनी यापैकी दीड वर्षांची शिक्षा भोगली आहे. या आधारावर आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली होती.


मात्र, या प्रकरणात इतर आरोपींना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्यामुळे लालूंच्या शिक्षेचा कालावधीही वाढवण्यात यावा, अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली होती. ही याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. 


दरम्यान, देवघर कोषागार घोटाळा प्रकरणातील लालूंच्या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयकडून अभिप्राय मागवला आहे. यासाठी न्यायालयाने सीबीआयला ५ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.