पुद्दुचेरीत राज्यपाल आणि काँग्रेस आमनेसामने; किरण बेदींच्या घराबाहेर मुख्यमंत्र्यांचे धरणे आंदोलन
किरण बेदी यांच्या हुकूमशाहीमुळे मोफत धान्यवाटपासह ३९ सरकारी योजना रखडल्याचा आरोप
पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत सध्या राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा वाद विकोपाला पोहोचला आहे. यामुळे गुरुवारी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. यापूर्वी दिल्लीतही अशाप्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली होती. आप सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील राजकीय लढाई देशभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर आता पुद्दुचेरीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी आज सकाळपासून राज निवासाबाहेर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. यामध्ये मंत्रिमंडळासह काँग्रेसचे आणि द्रमुकचे नेतेही सहभागी झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय निर्णयांवरून व्ही. नारायणस्वामी आणि किरण बेदी यांच्या धुसफुस सुरु होती. मात्र, राज्यातील हेल्मेटसक्तीच्या निर्णयानंतर हा वाद शिगेला पोहोचला. या पार्श्वभूमीवर व्ही. नारायणस्वामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्याच्या विकासाचे अनेक प्रस्ताव रखडत पडल्याचेही त्यांनी सांगितले.
तर नायब राज्यपाल किरण बेदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्या धरणे आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होत असल्याचे किरण बेदी यांनी म्हटले. मात्र, मी किरण बेदी यांच्या सततच्या हुकूमशाहीचा शांतपणे विरोध करत असल्याचे नारायणस्वामी यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल किरण बेदी यांनी ११ फेब्रुवारीला राज्यातील दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, तडकाफडकी असा निर्णय घेणे हे नागरिकांना त्रास देण्यासारखे ठरेल. त्यामुळे हेल्मेट परिधान करण्याविषयी पुरेशी जागरुकता निर्माण केल्यानंतरच हा निर्णय घ्यावा, असे नारायणस्वामी यांचे म्हणणे होते. तसेच किरण बेदी यांच्या लोकशाहीविरोधी कारभारामुळे मोफत धान्यवाटपासह ३९ सरकारी योजना रखडल्याचा आरोपही नारायणस्वामी यांनी केला.