भारतात कोरोनाचा आणखी एक संशयित रुग्ण
चीनमधून आलेल्या भारतीय तरुणीचे सॅम्पल्स पुण्यात तपासणीसाठी...
नवी दिल्ली : केरळमधील रुग्णापाठोपाठ आता भारतात आणखी एक कोरोना व्हायरसचा Coronavirus संशयित रुग्ण आढळला आहे. चीनमधून आपल्या घरी ऋषीकेशमध्ये परतलेल्या भारतीय तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. तिचे सॅम्पल्स पुण्यातल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचे ५ संशयित रुग्ण आढळून आलेत. या सर्वांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये चार पुरुषांचा तर एका महिलेचा समावेश आहे. यापूर्वीही दिल्लीत ३ संशयित आढळून आले होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूग्रस्त पहिला रुग्ण भारतात आढळून आला होता. केरळमध्ये हा रुग्ण आढळला असून तरुण चीनमधील वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. तपासणी केली असता तरुण पॉझिटिव्ह आढळला असून त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.
कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चीनमधून परतणाऱ्या सर्व भारतीयांची विमानतळावर तपासणी केली जात आहे.
चीनमधल्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे महाराष्ट्रातले काही विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. हुवेई विद्यापिठात २७ भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतायत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतले प्रत्येकी एक विद्यार्थीही तिथे अडकले आहेत. चंद्रपूरच्या भद्रावतीमधली भाग्यश्री उके ही विद्यार्थीनी हुवई विद्यापिठात शिक्षण घेतेय. या मुलांनी भारतात परतण्यासाठी दुतावासाशी संपर्क साधला. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही.
चीनमध्ये कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. आतापर्यंत या व्हायरनं २१३ जणांचा बळी घेतलाय. तर कोरोनाचे २ हजार नवे रुग्ण आढळून आलेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहिर केली आहे. WHOकडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. यातील बहुतांश नागरिक हे हुबई शहरातील आहेत.