अलाहाबाद : उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी आणखी दोन बालकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे गेल्या 2 दिवसांत 32 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद असल्यामुळे बालकं दगावल्याचं बोललं जातंय. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मतदारसंघ आहे. इथल्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडल्याचं जिल्हाधिकारी राजीव राऊतेला यांनी मान्य केलंय. 


मात्र ऑक्सिजनची कमतरता नसल्याचं त्यांनी म्हटलंय. थकबाकीमुळे ऑक्सिजन पुरवणाऱ्या खासगी कंपनीनं पुरवठा थांबवला असला, तरी नजिकच्या जिल्ह्यातून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं राऊतेला म्हणालेत. तसंच पुरवठादार कंपनीची निम्मी थकबाकी अदा कऱण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. 


गोरखपूरच्या घटनेवर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुःख व्यक्त करत या दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप ट्विटरवरुन केला आहे.