...म्हणून अपूर्वानं रोहित शेखरचा गळा दाबून केली हत्या?
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित धडपडत चालताना दिसतोय
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वा तिवारी हिला अटक केलीय. पोलिसांच्या चौकशीत अपूर्वी रोहितच्या नशेच्या व्यवसनामुळे हैराण होती. त्यामुळेच तिनं रोहितची गळा दाबून हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या दारुच्या व्यसनामुळे रोहित आणि अपूर्वाचे नातेसंबंध ताणले होते. त्यामुळे अपूर्वानं रोहितच्या हत्येचं प्लानिंग करून वेळ गाठली आणि गळा दाबून रोहितची हत्या केली.
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. गेल्या रविवारपासून या प्रकरणात अपूर्वाची चौकशी सुरू होती. वेगवेगळे विधानं करत असलेली अपूर्वा पोलिसांच्या नजरेतून सुटू शकली नाही. संशय अपूर्वाच्या भोवती फिरत असताना पोलिसांनी दोघांचेही कॉल डिटेल्स मिळवले.
लग्नापूर्वीही भांडण
लग्नापासूनच अपूर्वा आणि रोहित यांचं नातं सामान्य नव्हतं. लग्नापूर्वीही एकदा झालेल्या भांडणामुळे रोहितनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दोघांनी आपले वाद मिटवून लग्नात सात जन्म एकमेकांची सोबत करण्याच्या आणाभाका घेतल्या.
काय घडलं त्या दिवशी?
१५-१६ एप्रिल रोजी सकाळी १.३० वाजताच रोहितचा मृत्यू झाल्याचं त्याच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं. रोहितचा मृतदेह १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता रुग्णालयात नेण्यात आला. याचाच अर्थ जवळपास १५ तासांपर्यंत रोहितचा मृतदेह त्याच्या घरातच पडून होता. यावेळी त्याच्या पत्नीसोबत घरात काही नोकर मंडळीही उपस्थित होते.
मंगळवारी १६ एप्रिल रोजी रोहितची आई उज्ज्वला या दुपारी साकेत भागात मॅक्स रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या असतानाच अचानक त्यांना फोन आला. घरातील नोकर आणि त्यांचा दुसरा मुलगा सिद्धार्थ यांनी फोनवरून रोहितच्या नाकातून रक्त येत असून तो निपचित पडल्याची माहिती त्यांना दिली.
मतदान करून परतला होता रोहित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये काठगोदाममध्ये मतदान करण्यासाठी रोहित गेला होता. त्यानंतर १५ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास तो आपल्या डिफेन्स कॉलनीस्थित घरी परतला. तो घरी आला तेव्हाही नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो धडपडत चालताना दिसतोय. त्यानंतर १६ एप्रिल रोजी १६ तासानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात हलवलं... इथं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.