नवी दिल्ली : साडी परिधान केलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये कथितरित्या प्रवेश नाकारण्यात आला होता. प्रवेश नाकारताना साडी 'स्मार्ट ड्रेस' नाही, असे सांगून हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेला रोखण्यात आले होते. यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. मात्र, साडी परिधान केलेल्या प्रवेश नाकारणाऱ्या अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंटला (Restaurant Aquila) टाळे लागले आहे. दक्षिण दिल्ली नगर निगमने (SMCD) हे रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्विला रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला साडी घातल्याने कथितरित्या प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. दरम्यान, नोटीसमध्ये अलीकडील या घटनेचा उल्लेख नाही. त्याऐवजी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने आरोप केला आहे की रेस्टॉरंट हेल्थ ट्रेड लायसन्सशिवाय चालत होते. त्यानंतर मालकाला नोटीस बजावण्यात आली आणि त्याने हे हॉटेल बंद केले.


दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंट 27 सप्टेंबर रोजी बंद झाले. हे रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालत होते. प्रशासनाने प्रथम नोटीस बजावली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अक्विला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात साडी नेसून आलेल्या महिलेला प्रवेश नाकारला होता. त्यांनी त्यावेळी सांगितले होते, साडी स्मार्ट ड्रेसमध्ये येत नाही.


नोटीस दिल्यानंतर कुलूप लावले


कारवाईची पुष्टी करताना दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे (एसडीएमसी) महापौर मुकेश सूर्यन म्हणाले की अक्विला रेस्टॉरंट सध्या बंद करण्यात आले आहे. ते म्हणाले की अक्विला नावाचे हे रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालत होते. आम्ही त्यांना नोटीस दिली होती. त्यानंतर ते आता बंद झाले आहे. 


जमीन ताब्यात घेतल्याचा आरोपही


एसडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, अँड्र्यूज गंजमधील अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस 24 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. त्यात म्हटले आहे की, या क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी 21 सप्टेंबर रोजी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की आस्थापना आरोग्य व्यापार परवान्याशिवाय अस्वच्छ स्थितीत कार्यरत आहे. एवढेच नाही तर रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवरही बेकायदेशीर कब्जा केला आहे.


काय म्हटले आहे नोटीसमध्ये 


एसडीएमसीने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, "सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी 24 सप्टेंबर रोजी पुन्हा जागेची पाहणी केली आणि असे दिसून आले की व्यवसाय त्याच स्थितीत चालू आहे. ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 48 तासांच्या आत तुम्हाला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जे अयशस्वी झाल्यास कोणतीही नोटीस न देता सील करण्यासह योग्य कारवाई केली जाऊ शकते. याला उत्तर देताना अक्विला रेस्टॉरंटचे मालक म्हणाले की, हा व्यवसाय त्वरित बंद करण्यात आला आहे आणि तो SDMC ट्रेड लायसन्सशिवाय चालणार नाही.


काय आहे संपूर्ण वाद?


गेल्या आठवड्यात एका फेसबुक पोस्टमध्ये एका महिलेने दावा केला होता की तिला अक्विला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. कारण तिने साडी घातली होती. या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओही पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये एका कर्मचाऱ्याला साडी हा स्मार्ट ड्रेस नसल्याचे सांगताना दाखवण्यात आले. त्याचवेळी रेस्टॉरंटने सांगितले की, महिलेने तिच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. त्याच्या नावावर आरक्षण नसल्याने त्यांना थांबायला सांगितले. रेस्टॉरंटने आपल्या निवेदनात म्हटले होते की, मॅनेजरने हे सांगितले जेणेकरून ती महिला निघून जाईल आणि परिस्थिती हाताळली जाईल.