नवी दिल्ली : लोकसभेत अनुच्छेद 370 वर चर्चा सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. त्याआधी या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसचा या निर्णयाला विरोध आहे. गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. या दरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि अमित शहा यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत सादर केलं. त्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यावर बोलत होते.  त्यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने एका रात्रीत नियम धाब्यावर बसवून जम्मू-काश्मीरचे तुकडे केले आणि केंद्र शासित प्रदेश बनवला. या विधानानंतर अमित शहा चांगलेच भडकले.


लोकसभेत अमित शहा यांनी म्हटलं की, 'सरकारने कोणता नियम मोडला हे सांगावं. सरकार उत्तर द्यायला तयार आहे. काँग्रेस नेत्यांनी असंच कोणतंही विधान करु नये.'


त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, तुम्ही म्हटलं की काश्मीर हा अंतर्गत वाद आहे. पण या मुद्यावर संयुक्त राष्ट्रात 1948 पासून मॉनिटर करत आहे.


अमित शाह यांनी अधीर रंजन चौधरी यांना लगेचच रोखलं आणि म्हटलं की, " तुम्ही आधी हे स्पष्ट करा की, काँग्रेसची भूमिका काय आहे. संयुक्त राष्ट्र काश्मीरच्या मुद्द्यावर मॉनिटर करेल का असं काँग्रेसचं म्हणणं आहे का?." त्यानंतर लोकसभेत गोंधळ झाला.


अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, भारताच्या एका पंतप्रधानाने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर शिमला करार केला, तर दुसऱ्या पंतप्रधानाने लाहोर दौरा केला. मग हा अंतर्गत मुद्दा कसा असू शकतो.' या विधानानंतर पुन्हा लोकसभेत गोंधळ झाला.