भारत- चीन सैन्यांमधील तणावाबाबत लष्कर प्रमुखांचा मोठा खुलासा
लडाख आणि सिक्कीममध्ये नेमकं काय घडलं होतं?
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारताच्या जम्मू- काश्मीर येथील सीमेवरील तणावाच्या परिस्थितीसोबतच दुसरीकडे सिक्कीम भागातूनही चीनच्या सैन्यासोबतच्या वादंगाच्या परिस्थितीचीही माहिती समोर आली. ज्यामध्ये दोन्ही सैन्यातील जवानांमधील तणाव हा परिस्थितीला आणखी गंभीर वळण देऊन गेला. त्यातच भर म्हणजे, लडाखमध्ये भारताच्या हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टर्सच्या फेऱ्या.
देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत समोर आलेली ही सर्व माहिती आणि त्यामुळे लष्कराची वाढलेली जबाबदारी अशा एकंदर चर्चांनी जोर धरताच खुद्द भारताच्या लष्कर प्रमुखांनीच महत्त्वाची माहिती दिली आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीचा आणि एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत आणि आताही घडत आहेत. आम्ही या सर्व परिस्थितीला दोन देशांमध्ये असणाऱ्या शिष्टाराने हाताळतो, असं लष्कर प्रमुख म्हणाले.
लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा वाद अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा गस्त घातलण्याची वेळ येते आणि दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा खटका उडतो, अशी माहिती देत ल़़डाख आणि सिक्कीम येथे एकाच वेळी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटना हा योगायोग असल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'
लडाख आणि सिक्कीममध्ये नेमकं काय घडलं होतं?
गस्त घालत असतानाच दोन्ही देशाचे सैन्य अधिकारी आमनेसामने आले आणि त्यांच्यात ही तणावाची परिस्थिती उदभवली. हा वाद मिटवला गेला खरा पण, त्यामुळे वातावरण गंभीर झालं होतं.
चीनच्या सैन्यासोबतच्या या सामन्याच्या चर्चा शमत नाहीत, तोच चीनकडून पुन्हा एकदा कुरापती केल्या जात असल्याचं वृत्त समोर आलं होतं. लडाखमध्ये असणाऱ्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजेच एलएसीजवळ चीनी सैन्याच्या हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. ज्यामध्ये चीनचे चॉपर भारताच्या हद्दीनजीक येताना दिसले. ज्यामुळे खबरदारी म्हणून भारतीय वायुदलाला गस्तीसाठी आणलेलं लढाऊ विमान बाहेर काढावं लागलं. एलएसीनजीक चीनचे चॉपर्स ये-जा करत असल्याचं लक्षात येताच भारताकडून हा निर्णय घेण्यात आला होता.