श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक संदीप थापा यांना वीरमरण आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता. पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये उखळी तोफा आणि लहान पल्ल्याच्या शस्त्रांनी मारा करण्यात आला. यामध्ये लान्स नायक संदीप थापा शहीद झाले. दरम्यान, भारताकडूनही पाकिस्तानच्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 


यापूर्वी गुरुवारी पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात उखळी तोफांनी मारा केला होता. त्यावेळी भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या माऱ्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. 



काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले असून दोन्ही देशातील व्यापाराबरोबर रेल्वे आणि बससेवाही बंद केली आहे. तसेच भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांना माघारी पाठवले होते.


पाकिस्तानकडून काश्मिरी जनतेला भडकावण्याचाही प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लष्करी ताकदीचा वापर करून दहशतवाद्यांना हरवणे शक्य आहे मात्र, जेव्हा एखाद्या धर्माचे नागरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणे इतके सोपे नसते, असे इम्रान यांनी सांगितले.