उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला; एक जवान शहीद
भारतीय सैन्याकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
श्रीनगर: पाकिस्तानी सैन्याकडून बुधवारी सीमारेषेलगत असणाऱ्या उरी सेक्टरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी आणि एका स्थानिक महिलेचा मृत्यू झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील हाजीपीर परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यानंतर भारतीय सैन्याकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव नसीमा असे आहे. पाकिस्तानकडून उरीत मोठ्याप्रमाणावर उखळी तोफांचा मारा केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने बारामुल्ला आणि शोपिया जिल्ह्यातील कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा एक आणि जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. सध्या पोलिसांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यापूर्वी पाकिस्तानच्या बॅट कमांडोंनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने हा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा खात्मा करण्यात आला होता.