मुंगेर : बिहारच्या मुंगेर जिल्हात रेल्वेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी भारतीय सैनिकाची गोळी घालून हत्या केली. पोलिसांनी सैनिकाचा मृतदेह रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतला आहे. मात्र हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर-जमालपूर (५३४९७) अप एक्सप्रेस भागलपूरवरून सुटल्यानंतर जमालपूर स्टेशनवर साधारण रात्री २ वाजेपर्यंत थांबली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी डब्याची झडती घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह हाती लागला. त्यानंतर या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. 


जमालपूर रेल्वे पोलीसांचे सहाय्यक निरीक्षक (एएसआय) मदन पासवान यांनी सांगितले की, ''मृत व्यक्तीजवळ असलेल्या ओळखपत्र आणि आधारकार्डनुसार मृत व्यक्ती ही सैनिक असून उमेश शाह असे त्याचे नाव होते. तो मुंगेर येथील टीकारामपूर येथे राहणारा होता. 
पोलीस मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. परंतु, अद्यापही हत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे पासवान यांनी सांगितले.