मुंबई : भारतीय सैन्यदलाच्या विविध सेवांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भारतीय सैन्याकडून याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. जवळपास दहा दिवसांची ही भरती प्रक्रिया ठाणे जिल्ह्यात होणार असून, महाराष्ट्रातील युवांना याद्वारे सैन्यदलातील सेवेत रुजू होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. डिसेंबर १३ ते २३ यादरम्यान ही भरती प्रक्रिया पार प़डणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या तरुणांना या भरती प्रक्रियेचा भाग होता येणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांना मायभूमीच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी संधी देत एक अभिमानास्पद जीवन जगण्याची संधी देण्यात येत असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं आहे. 


कोणत्या पदांसाठी होणार भरती? 


जवान जनरल ड्युटी, तांत्रिक विभाग, तांत्रिक विभाग (एव्हिएशन आणि अम्युनिशन परीक्षक), सहायक परिचारिका, वेटनरी, जवान ट्रेड्समन, क्लर्क, स्टोअर कीपर, शिपाई फार्मा, हवालदार सर्वेयर ऑटो कोरिओग्राफर, ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (धार्मिक शिक्षक) अशा विभागांसाठीही भरती प्रक्रिया होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


दहा दिवस चालणाऱ्या या खुल्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ज्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार आहे. 



प्रवेश पत्रकावर नमूद करण्यात आलेल्या तारखांनुसार उमेदवारांना भरतीसाठी हजर व्हावं लागणार आहे. ज्यामध्ये बायोमॅट्रीक प्रणाणीने त्यांची पडताळणी झाल्यानंतर पुढे तीन टप्प्यांच्या भरती प्रक्रियेसाठी त्यांना पाठवण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सर्वसाधारण प्रवेश परीक्षा (लेखी) असे टप्पे उमेदवारांना पार करावे लागणार आहेत. पहिल्या दोन्ही चाचण्यांमध्ये यशस्वी झालेले उमेदवार तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र असतील. भरतीचा तिसरा टप्पा २०२० जानेवारी- फेब्रुवारी या महिन्यांमध्ये होणार आहे. ज्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना पुढे सैन्यदलाच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क साधा - 022-22153510