नवी दिल्ली : ‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू जगप्रवासाला रवाना झाला आहे. भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेतून हा जगप्रवास होणार आहे. गोव्यात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या नौकेला हिरवा झेंडा दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभ्रमंतीसाठी निघालेल्या आयएनएसव्ही तारिणीतल्या चमूमध्ये - लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी आणि लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे. 


या जलप्रवासाकरता सर्व महिला अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून मोहिमेआधी सुमारे 20 हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला. यामध्ये 2016 आणि 2017 मधल्या दोन मोहिमा आणि डिसेंबर 2016 मधल्या गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश होता. 


नाविका सागर परिक्रमा पाच टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. परिक्रमेदरम्यान रसद तसंच गरजेनुसार नौका दुरुस्तीसाठी चार बंदरांवर ही नौका विसावा घेणार आहे. या पाच टप्प्यांतर्गत गोवा ते फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) हा प्रवास १० सप्टेंबर २०१७ ते १२ ऑक्टोबर २०१७ दरम्यान होणार आहे. फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया) ते लेटलटन (न्यूझीलंड) हा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास २५ ऑक्टोबर २०१७ ते १६ नोव्हेंबर २०१७ दरम्यान पूर्ण केला जाणार आहे. लेटलटन (न्यूझीलंड) ते पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स) हा तिसऱ्या टप्प्यातील प्रवास २३ नोव्हेंबर २०१७ ते २८ डिसेंबर २०१७ दरम्यान पूर्ण केला जाणार आहे. पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्स) ते केप टाउन (दक्षिण आफ्रिका) हा चौथ्या टप्प्यातला प्रवास १० जानेवारी २०१८ ते ८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान होणार आहे. केप टाउन (दक्षिण आफ्रिका) इथून गोव्यासाठी परतीचा प्रवास २१ फेब्रुवारी २०१८ ला सुरु होऊन ४ एप्रिल २०१८ रोजी हा चमू गोव्यात पोहोचणार आहे. 


या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणं आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणं हा उद्देश आहे.