नवी दिल्ली : भाजपा नेते आणि केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. पाकिस्तानमधील 'जैश ए मोहम्मद'च्या ठिकाणांवर वायुसेनेने केलेल्या एअरस्ट्राईकवर पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्यांना भारताची समज नाही ते देशाच्या सुरक्षा आणि निती बद्दल बोलत असल्याचे जेटली म्हणाले. जर गुरूच असा असेल तर शिष्यही तसाच असणार, हेच या देशाला आज भोगावे लागत असल्याचा टोला त्यांनी गांधी परिवाराला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा नेता अरूण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी क्रिकेटर गौतम गंभीरला पार्टीत प्रवेश दिला. यावेळी त्यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण जग भारतासोबत आहे. केवळ काँग्रेस आणि पाकिस्तानला ते चुकीचे वाटत आहे. त्यांच्या वक्तव्यावरून तरी तसेच दिसत आहे. जगातील कोणत्याही देशाने असे म्हटले नाही. पित्रोदा यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. 


भारत घरात घुसून दहशतवाद्यांना मारतो. बॅकफूटवर खेळून दहशतवादाशी जिंकता येऊ शकत नाही. दहशताद्यांना नुकसान पोहोचल्याने काँग्रेसला त्रास झाला. भारत 26/11 हल्ल्याच्या आधीपासून दहशतवाद्यांशी लढत आहे. ते येतात आणि मारून निघून जातात असेच नेहमी होत आले आहे. पण आता पंतप्रधान मोदींनी मोठे काम केले आहे. आता जिथून दहशतवादाला सुरूवात होईल तिथेच त्यांचा अंत केला जाईल. आम्ही केवळ दहशतवादाला लक्ष्य केले असून यशस्वी होऊन परत आल्याचेही ते म्हणाले. 


भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्याऐवजी पाकिस्तानशी चर्चा करायला पाहिजे होती, असे मत गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये खरंच ३०० दहशतवादी ठार झाले असतील तर सरकारने पुरावे सादर करून हा विषय संपवायला हवा. कारण, परदेशातील वृत्तपत्रांमध्ये याविषयी वेगळीच माहिती छापून आली आहे. त्यामुळे आपण खरंच बालाकोटमध्ये हल्ला केला का? या हल्ल्यात एकतरी दहशतवादी ठार झाला का?, अशा शंका माझ्या मनात उपस्थित झाल्या आहेत. देशाचा एक नागरिक म्हणून मला हे जाणून घेण्याचा हक्क आहे. यामुळे मी नागरिक म्हणून वाईटपणा ओढवून घेत असेन. पण म्हणून मी राष्ट्रप्रेमी नाही, असे नाही. मला केवळ सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, इतकेच माझे म्हणणे आहे, असे पित्रोदा यांनी म्हटले. 



पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच ट्विट करून पित्रोदा यांच्या विधानावर तोफ डागली.



मोदींनी म्हटले आहे की, गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी बालाकोट येथे भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्षांच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक असणाऱ्या सॅम पित्रेदा यांनी भारतीय सैन्यदलावर अविश्वास दाखवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाची एकप्रकारे समर्पक सुरुवात केल्याचा उपरोधिक टोलाही मोदींनी लगावला