नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली रविवारी पंचत्वात विलीन झाले. दिल्लीच्या निगम बोध स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहन जेटली यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. तत्पूर्वी आज सकाळी अरूण जेटली यांचे पार्थिव कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानाहून भाजप मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अनेक राजकीय नेतेही यावेळी भाजप मुख्यालयात हजर होते. यानंतर निगम बोध स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्राही काढण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूण जेटली यांचे शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ते ६६ वर्षांचे होते. भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सर्वपक्षीय संबंध असणारा नेता म्हणून जेटली यांची ओळख होती. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींना विशेष मान होता. 


माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिले होते.


२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारच्या कारभाराची घडी बसवण्यात अरूण जेटली यांचा मोठा वाटा होता. अडचणीच्या काळात सरकारची बाजू समर्थपणे मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीतही जेटलींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.


लाईव्ह अपडेटस्


* अरूण जेटली अनंतात विलीन




​*अरुण जेटलींचे पार्थिव निगम बोध स्मशानभूमीत
*अरुण जेटलींवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 




*जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अरुण जेटली यांचं अंत्यदर्शन घेतलं. 



* अरुण जेटलींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, थोड्यावेळात निगम बोध घाटावर होणार अंत्यसंस्कार


* अरूण जेटलींच्या अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात लोकांची गर्दी