विद्यार्थी नेता, वकील, ते अर्थमंत्री... जेटलींचा बहुआयामी प्रवास
आणीबाणीच्या काळात जेटली तुरुंगातही गेले होते.
नवी दिल्ली: भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे ९ ऑगस्ट रोजी जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून जेटली यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी दिल्लीत झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉम तर दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. यानंतर विद्यार्थी चळवळीतून जेटलींनी राजकारणात प्रवेश केला. यानंतरच जेटलींचा संपूर्ण प्रवास बहुअयामी ठरला.
* विद्यार्थीदशेत असताना अरूण जेटली यांची राजकारणातील रूची वाढली. या काळात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत काम केले. यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी अरूण जेटली यांच्यातील बुद्धिमता आणि प्रभावी वक्तृत्व हे गूण हेरले.
* आणीबाणी संपल्यानंतर जेटली तुरुंगातून बाहेर आले. यानंतर त्यांनी जनसंघात प्रवेश केला. या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दिल्लीतील प्रमुखपद आणि संघटनेचे सचिवपद भुषविले. या काळात ते आदर्श राजकारणी म्हणून उदयाला आले.
* भाजपच्या स्थापनेनंतर १९८० साली जेटली पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी स्वत:च्या प्रतिभेची चुणूक दाखवली. १९८० ते १९९० च्या काळात भाजप देशाच्या राजकीय अवकाशात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी पक्षाचे फायरब्रँड नेते होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अरूण जेटली यांची राजकीय जडणघडण झाली.
* या काळात जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली. अत्यंत कमी काळात त्यांनी देशातील आघाडीचे वकील म्हणून नावलौकिक कमावला होता.
* १९८९ साली विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारने अरूण जेटली यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती केली. या काळात त्यांनी बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीची कागदपत्रे तयार केली होती.
* १९९९ साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांना स्थान मिळाले. त्यांच्यावर कायदा व सामाजिक न्याय, माहिती व प्रसारण मंत्री आणि राज्य निर्गुंतवणूक या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांनी ओळख प्रस्थापित केली. त्यामुळे अवघ्या एका वर्षात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली.
* या काळात अरूण जेटली यांची राजकीय कारकीर्द बहरात आली. प्रमोद महाजन आणि अटलबिहारी वाजपेयी पक्षसंघटेपासून दूर झाल्यानंतर भाजपचे मुख्य रणनीतीकार म्हणून जेटली नावारुपाला आले.
* यानंतर जेटली राज्यसभेवर निवडून गेले. २००९ साली ते राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते झाले.
* या काळात भाजपचा आधारस्तंभ झालेल्या अरूण जेटली यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपची रणनीती आखली. या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
* या निवडणुकीत त्यांनी अमृतसरमधून पहिल्यांदाचा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेसचे नेत कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
* जेटली यांना राजकारणाव्यतिरिक्त क्रिकेटमध्येही रस होता. २०१४ पूर्वी त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणूनही कारभार सांभाळला.
* २०१४ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर जेटलींनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
* २०१४ साली मोदी सत्तेत आल्यानंतर सरकारच्या कारभाराची घडी बसवण्यात अरूण जेटली यांचा मोठा वाटा होता. अडचणीच्या काळात सरकारची बाजू समर्थपणे मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीतही जेटलींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.