अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, दिग्गज नेते एम्समध्ये
भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेटलींना भेटण्यासाठी एम्स रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे. मोदी हे २ दिवसांच्या भूटान दौऱ्यावरुन नुकतेच भारतात परतले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एम्समध्ये पोहोचले. ९ ऑगस्टला अरुण जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. जेटली हे सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत.
राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनीदेखील एम्समध्ये जाऊन जेटलींची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अश्विनी चौबे, ज्योतिरादित्य शिंदे, अरविंद केजरीवाल, मोहन भागवतदेखील एम्समध्ये गेले होते. अरुण जेटलींना एक्स्ट्रा कॉर्पोरेशनल मेंब्रेन ऑक्सिजिनेशन (ईसीएमओ)मध्ये ठेवण्यात आलं आहे. ज्या रुग्णांची फुफ्फुस आणि हृदय काम करत नाही, त्यांना ईसीएमओमध्ये ठेवलं जातं.
९ ऑगस्टला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जेटलींना एम्समध्ये नेण्यात आलं. जेटलींना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर त्यांना व्हँटिलेटरवर ठेवण्यात आलं. १२ आणि १३ ऑगस्टला व्हँटिलेटर काही काळासाठी काढण्यात आला होता, पण तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हँटिलेटर लावण्यात आला.