नवी दिल्ली - केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटलीच सादर करणार आहेत. सध्या वैद्यकीय तपासणीसाठी अरुण जेटली अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प लोकसभेत कोण सादर करणार, असा प्रश्न विचारण्यात येत होता. पण जेटली २५ जानेवारीलाच देशात परतत आहेत. आणि तेच एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. मेमध्ये नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुण जेटली १३ जानेवारीला वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेले आहेत. किडनीशी संबंधित आजारामुळे तपासणीसाठी ते अमेरिकेला गेल्याची माहिती मिळाली होती. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठीही जेटली भारतात परतणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पण ती चुकीची असल्याचे वृत्तसंस्थेच्या बातमीवरून स्पष्ट झाले आहे. जेटली शुक्रवारी, २५ जानेवारीलाच भारतात परतणार आहेत. त्यामुळे तेच १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.


दरम्यान, अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करण्यापूर्वी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये होणारा हलवा समारंभ सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला आणि रस्ते व परिवहन राज्यमंत्री राधाकृष्ण आणि अर्थसचिव सुभाष गर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्पाच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयातच राहावे लागते. त्यांना बाहेर कोणाशीही संपर्क साधू दिला जात नाही. त्याच्यासाठी एक खास वैद्यकीय पथकही नॉर्थ ब्लॉकमध्ये तैनात करण्यात आलेले असते. या कर्मचाऱ्यांकडील मोबाईलही काढून घेतले जातात. त्याचबरोबर त्यांना इंटरनेट वापरण्याचीही परवानगी दिली जात नाही. कार्यालयातील दूरध्वनी सुरू असला तरी त्यामध्ये केवळ बाहेरील फोनच घेता येऊ शकतात. बाहेर कोणालाही फोन करता येत नाही.