नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. अरुण जेटलींनी दाखल केलेली मानहानीची याचिका मागे घेण्यासाठी जेटली आणि आप नेत्यांनी दिल्लीच्या न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांच्याबरोबरच आप खासदार संजय सिंग, आशुतोष, दीपक बाजपेयी आणि प्रवक्ता राघव चड्डा यांनीही जेटलींची माफी मागितली आहे. आप नेते कुमार विश्वास यांनी माफी न मागितल्यामुळे त्यांच्याविरोधात हा खटला सुरुच राहणार आहे. केजरीवाल यांनी जेटलींबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरूनही माफी मागितली आहे. केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी माफी मागितल्यामुळे मानहानीचा हा खटला निकाली निघाला आहे. 


२०१५ साली दाखल केला खटला


अरुण जेटलींनी डिसेंबर २०१५मध्ये केजरीवाल आणि आपच्या इतर ५ नेत्यांवर १० कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएचे अध्यक्ष असताना अरुण जेटलींनी आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. 


केजरीवाल यांनी गडकरींचीही मागितली माफी 


याआधी अरविंद केजरीवाल यांनी १९ मार्चला नितीन गडकरींचीही माफी मागितली. केजरीवाल यांनी गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करता न आल्यामुळे केजरीवालांनी माफी मागितली आणि हा खटलाही मागे घेण्या आला. २०१४ साली केजरीवाल यांनी गडकरींना भ्रष्ट नेत्यांच्या यादीमध्ये टाकलं. यानंतर गडकरींनी केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.