नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. आमच्याकडे केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे असल्याचे त्यांनी जाहीर पत्रकारपरिषदेत म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद केजरीवाल चेहऱ्यावर निष्पाप भाव आणून मी दहशतवादी आहेत का, असा प्रश्न विचारतात. हो तुम्ही दहशतवादीच आहात. आमच्याकडे ते सिद्ध करायला पुरेसे पुरावे आहेत. ते स्वत:ला अनागोंदी माजवणारे म्हणवून घेतात. अनागोंदी माजवणाऱ्यांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये फारसा फरक नसतो, असे जावडेकर यांनी म्हटले. 


काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. केजरीवालांसारखे नटवरलाल, केजरीवालांसारखे दहशतवादी देशात लपलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवालांसारख्या दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे वर्मा म्हणाले होते.



प्रवेश शर्मा यांच्या या वक्तव्यावर 'आप'कडून आक्षेप घेण्यात आला होता. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर केजरीवाल यांनी भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला होता. मी तुम्हाला मुलासमान वाटत असेन तर झाडू या निशाणीला मतदान करा आणि मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले होते.