नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी कुमार विश्वास यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना डावलून पक्षाने तिघांच्या नावाची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पार्टीने (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार दिले आहेत. पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.



दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. यावेळी राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मात्र, कुमार विश्वास आणि अशुतोष यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते.



संजय सिंह हे आपचे संयोजक आहेत. ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनासोबत पहिल्यापासूनच जोडलेले आहेत. तर नारायण दास गुप्ता 'आप'चे दोन वर्षांपासून चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम पाहतात. तर तिसरे उमेदवार सुनील गुप्ता एक ट्रस्ट चालवतात.