Arvind Kejriwal Comment On Prime Minister Ask For Book Also: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवी दिल्लीमधील राउज एवेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये सक्तवसुली संचलनालयाने केजरीवाल तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं कारण देत कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. कोर्टाने ही विनंती मान्य करत केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये तिसऱ्यांदा वाढ केली. यापूर्वी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाल्यानंतर 7 दिवसांची म्हणजे 28 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 1 एप्रिलपर्यंतची कोठडी वाढवून देण्यात आली होती. कोर्टामध्ये नेलं जात असताना केजरीवाल यांनी पंतप्रधानांचा उल्लेख करत अगदी मोजक्या शब्दांमध्ये एक विधान केलं. विशेष म्हणजे कोठडीमध्ये केजरीवाल यांनी मागणी केलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचा संबंध पंतप्रधानपदाशी आहे.


अटक आणि टिकेची झोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहार प्रकरणामध्ये 21 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी झालेल्या 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. हे मुस्कटदाबीचं राजकारण असून देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचं 'इंडिया' आघाडीतील अनेक नेत्यांनी म्हटलं. रविवारीच रामलीला मैदानामध्ये 'इंडिया' आघाडीतील घटकपक्षांनी 'लोकशाही वाचवा रॅली'चं आयोजन केलं होतं. या रॅलीला केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही उपस्थित होत्या. याच रॅलीच्या दुसऱ्या दिवशी आज केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.


केजरीवाल जाता जात काय म्हणाले?


ईडीचे अधिकारी आणि पोलिसांच्या सुरक्षा कड्यामधून कोर्टात जाताना केजरीवाल यांनी पंतप्रधान जे काही सध्या करत आहेत ते देशासाठी चांगलं नसल्याची प्रतिक्रिया नोंदवली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरुन कोर्ट रुममध्ये जातना केजरीवाल यांनी, "प्रधानमंत्रीजी ये जो कर रहे हैं, वो देश के लिये ठिक नहीं हैं" असं म्हटलं.



पंतप्रधानपदाचा उल्लेख असलेलं पुस्तकही मागितलं


केजरीवाल यांनी कोर्टाकडे काही गोष्टींची मागणी केली. कोठडीमध्ये राहताना प्रकृतीसंदर्भातील समस्येमुळे डाएटच्या जेवणाची परवानगी केजरीवाल यांनी मागितली. तसेच त्यांनी काही औषधांचीही मागणी आपल्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टाकडे केली. याशिवाय केजरीवाल यांनी 3 पुस्तकं कोठडीमध्ये वाचनासाठी हवी आहेत अशी मागणी कोर्टाकडे केली. यामध्ये 'रामायण' आणि 'महाभारत' या दोन धार्मिक पुस्तकांबरोबरच पंतप्रधानपदाशी संबंधित एका पुस्तकाची मागणी केजरीवाल यांनी केली. महिला पत्रकार नीरजा चौधरी यांनी लिहिलेल्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड' या पुस्तकाची प्रत आपल्याला कोठडीमध्ये वाचनासाठी मिळावी अशी मागणी केजरीवाल यांनी कोर्टाकडे केली आहे.


नक्की वाचा >> '..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल


काय आहे 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड' पुस्तकामध्ये?


ज्येष्ठ पत्रकार असलेल्या नीरजा यांनी लिहिलेल्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड' या पुस्तकामध्ये भारताच्या 6 पंतप्रधानांनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भातील वेगवेगळे पैलू उलगडण्यात आले आहेत. जनमत आणि विरोधकांच्या दबावादरम्यान निर्णय घेताना भारताच्या 6 पंतप्रधानांनी कशाप्रकारे विचार केला आणि काय निर्णय घेतले, त्याचे काय परिणाम झाले याबद्दलचा तपशील आणि लेखाजोखा या पुस्तकात आहे. या पुस्तकामध्ये ज्या 6 पंतप्रधानांबद्दलचे किस्से नमूद करण्यात आले आहेत त्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वानथ प्रताप सिंह, पी. व्ही. नृसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.