`बजरंगबलीच्या कृपेने जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये ‘हनुमान चालीसा’शिकवा`
दिल्लीवासियांना हनुमानाच्या कृपेपासून वंचित का ठेवायचे?
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आम आदमी पक्षा'ला घवघवीत यश मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपच्याही अनेक नेत्यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले. मात्र, कैलास विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन करताना त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला होता. भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी केजरीवाल यांनी एका सभेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती.
हाच धागा पकडत कैलास विजयवर्गीय यांना केजरीवाल यांना एक सल्ला दिला आहे. अरविंद केजरीवाल तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा. हनुमानजी शरण आलेल्यांना आशीर्वाद देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता दिल्लीतील मदरसे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हनुमान चालिसा शिकवणे गरजेचे झाले आहे. दिल्लीवासियांना हनुमानाच्या कृपेपासून वंचित का ठेवायचे, असा सवाल कैलास विजयवर्गीय यांना केजरीवाल यांना विचारला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय?
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला एकहाती सत्ता दिली आहे. आपने विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळविला. तर भाजपाला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही.