शिवसेना एनडीएतून बाहेर, अरविंद सावंतांचा राजीनामा
शिवसेना एनडीएतून बाहेर
नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि केंद्रीय नेते अरविंद सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आज सकाळीच त्यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. भाजपाने दिलेला शब्द न पाळल्याने हा राजीनामा दिल्याचे अरविंद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.
३० मेला मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवजड उद्योग खाते मी संभाळले. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक झाल्या. त्यात महायुतीला जनमत मिळाले. निवडणूक लढताना सत्ता आणि पदांचं समान वाटप हे सूत्र ठरले होते. पण भाजपाने हा शब्द पाळला नसल्याचे सावंत म्हणाले.
अशावेळी मी इथे काम करु हे नैतिकदृष्ट्याही मला योग्य वाटत नाही. म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझा राजीनामा यांच्याकडे पाठवला ते म्हणाले. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल आहेत. पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची ते वाट पाहत आहेत.