नवी दिल्ली: राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात अक्षरश: रान उठवले आहे. मात्र, त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल न्यायालयात रिलायन्स कम्युनिकेशनचा (आरकॉम) खटला लढवत असल्याचे समोर आले आहे. ही परिस्थिती पाहून अनेकांची अवस्था हसू की रडू, अशी झाली असेल. मात्र, खुद्द कपिल सिब्बल याबाबत निवांत आहेत. याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली असता सिब्बल यांनी म्हटले की, हो, मी संसदेत अनिल अंबानी यांच्याविरोधात आहे. मात्र, माझ्या पेशाचा भाग म्हणून मी न्यायालयात रिलायन्स कम्युनिकेशन्सची बाजू मांडत असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राफेलच्या मुद्द्यावरून भाजप आणि नरेंद्र मोदी यांना झोडपून काढले. रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्याच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा दावा यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.


रिलायन्स कम्युनिकेशनने तब्बल ५५० कोटी रुपये थकवल्याविरोधात एरिक्सन या मोबाईल उत्पादक कंपनीने अनिल अंबानी यांच्याविरोधात दावा ठोकला आहे. या खटल्याची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुकुल रोहतगी आणि कपिल सिब्बल यांनी रिलायन्स कम्युनिकेशनची बाजू मांडली. 


रिलायन्स कम्युनिकेशन बऱ्याच काळापासून पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. अनिल अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एरिक्सन कंपनीचे ५५० कोटी रुपये देण्याची वैयक्तिकरित्या हमी दिली होती. यापूर्वी न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनला पैसे चुकते करण्यासाठी ३० डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, त्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशनला अपयश आले होते.