नवी दिल्ली: दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या धर्मपरिषदेमुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, तरीही  COVID-19 मुळे भारतात फार भयानक परिस्थिती उद्भवणार नाही, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) वर्तविण्यात आला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १,३९७ रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, अमेरिकेचा विचार करता अजूनही भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा अत्यंत कमी आहे, असे मत ICMRच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच सामान्य लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ ज्याठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा जास्त धोका असेल तिथेच मास्क वापरणे गरजेचे आहे. अमेरिका आणि भारतामधील परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे संसर्गाचा धोका फारच कमी आहे. त्यामुळे केवळ कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या लोकांनीच मास्क परिधान करावेत, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला. 

याशिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही भारतातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे संकेत दिले आहेत. भारतात अजूनही कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
अमेरिकेत आतापर्यंत १,६४,६२० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३१७० जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण हे चीन (८२,२४१) आणि इटलीपेक्षाही (१,०१,७३९) जास्त आहे. मात्र, भारतात लॉकडाऊननंतर कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावला आहे. 

आतापर्यंत देशभरात ४२,७८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी खासगी लॅबची मदत घेतली जात आहे. तसेच कोरोनाचा एक रुग्ण आढळलेला परिसरही सील केला जात आहे. जेणेकरून संबंधित ठिकाण भविष्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.