पुणे : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींच्या हत्येचा मुद्दा ओवेसींनी उचलला आणि नथुराम गोडसे नंबर १ हिंदू रत्न आतंकवादी असल्याची टीका ओवेसीनं केली. माझ्या या वक्तव्यावर नोटीस द्यायची हिंमत दाखवावी, असा इशाराही ओवेसींनी दिला. ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदी हे मुस्लिमांचे 'दुश्मन' असल्याचं वक्तव्य ओवेसींनी केलं.


'आता आम्ही घाबरणार नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या ७० वर्षांमध्ये मुस्लिमांनी कधीच देश विकायचा प्रयत्न केला नाही. पण प्रत्येकवेळी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि शोषण करण्यात आलं. आम्हाला मागच्या ७० वर्षांपासून घाबरवलं जात आहे, पण आता आम्ही घाबरणार नाही. तुम्ही आम्हाला मारु शकता तर मारा. आम्ही जगलो तर इकडेच जगू आणि मेलो तरी इकडेच मरु, असं ओवेसी म्हणाले.


भारतीय मुसलमान सीरिया आणि पाकिस्तानला जाणार नाहीत. ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, ते आधीच गेले आहेत. आमच्या पुर्वजांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात लढाई केली आणि हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली.


पंतप्रधान मोदींवर निशाणा


ओवेसींनी तीन तलाकच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला. मोदींनी डोळे उघडले पाहिजेत आणि डोक्यावरचा पडदा हटवला पाहिजे. मोदी मुस्लिम महिलांचे शुभचिंतक नाहीत. तुम्ही आमचे 'दुश्मन' आहात, अशी टीका ओवेसींनी केली.