नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने अयोध्येतील राम मंदिरावर शिक्कामोर्तब केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला ५ एकर जमिनीची भिक नको, असेही ते म्हणालेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे हा निकाल अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया मुस्लिम पक्षकारांनी दिलीय. कायदेशीर सल्ला घेऊन या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार केला जाईल, असं सुन्नी वक्फ बोर्डाचे पक्षकार जफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्व समुदायांना शांतता राखण्याचं आवाहन केले आहे.



दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्यासाठी पुढच्या तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देशही केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा कोर्टाने फेटाळला असला तरी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत. पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालातील पुराव्यांच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे. 


मशिदीसाठी देण्यात येणारी जागा ही पंचक्रोशीच्या बाहेर असावी जेणेकरुन मंदिर प्रदक्षिणेस अडथळा येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. घो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे. अयोध्या वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चांगला आहे. अयोध्या परिसरात मशिदीसाठी पाच एकर जागा द्यायला काही हरकत नसल्याचेही ते म्हणाले.