नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक अशी ट्रेन सुरु केली जी भगवान शिव यांच्या तिर्थस्थानांना जोडते. वाराणसी ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या काशी महाकाल एक्सप्रेस मात्र आता एका वादामुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये एक सीट ही भगवान शिव यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांना टॅग करत त्यांनी ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशी महाकाल एक्सप्रेसच्या बी5 कोचमध्ये सीट नंबर 64 ला देवाऱ्याचं स्वरुप आलं आहे. रेल्वेमध्ये ही भक्तांना भगवान शिवचं दर्शन करता यावं म्हणून या जागी भगवान शिव यांचा फोटो ठेवून अध्यात्मिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करत ट्विट केलं. सोबत त्यानी संविधानाची प्रस्तावना जोडली आहे. संविधानाच्या या प्रस्तावनेत सर्व धर्माच्या लोकांसोबत एक समान व्यवहार करण्यास सांगण्य़ात आलं आहे.



रविवार काशी दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला. या दरम्यानच त्यांनी काशी महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन भगवान शिव यांची ज्योतिर्लिंग असलेल्या ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथ यांना जोडते.


या रेल्वेत भक्तांना अध्यात्मिक वातावरण मिळण्यासाठी भजन,कीर्तनचं ही आयोजन करण्यात आलं आहे. कॅसेटच्या माध्यमातून लोकांना भजन ऐकता येणार आहे.