नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. यावरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) यांनी मोठं व्यक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीच्या ( varanasi)  ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque) सर्वे पूर्ण झाला. हा सर्वे सलग तीन दिवस सुरु होता. यातून काही महत्त्वाचं निरीक्षण समोर आलं. सर्वे करणाऱ्या टीमने सोमवारी नंदीसमोरील विहिरीचं सर्वेक्षण केलं. या सर्व्हेत विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी केला.


दरम्यान, ज्ञानवापी मशीद संकुलातील तलावामध्ये एक 'शिवलिंग' सापडले आहे हा दावा मुस्लिम पक्षांनी फेटाळून लावला. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते क्षेत्र सील करण्याचे आदेश वाराणसी येथील न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. तसेच, कोणत्याही अधिकाऱ्यांना या भागात जाण्यापासून रोखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.


तर, ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत सरकारला इशारा दिला आहे.


AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'ही मशीद अनंत काळपर्यंत राहणार आहे. देशातील मुस्लिमांनी बाबरी मशीद गमावली आहे. परंतु ते दुसरी मशीद गमावणार नाहीत. 'ज्ञानवापी मस्जिद, मस्जिद थी, और कयामत तक रहेगी इंशाअल्लाह' असा व्हिडिओ ओवेसी यांनी ट्विट केला आहे.