आसाराम बापूसमोर हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती नतमस्तक
जोधपूर तुरूंगात कैदेत असलेल्या आसाराम महाराजाचे भक्त अजून काही कमी झालेले नाहीत.
जोधपूर : जोधपूर तुरूंगात कैदेत असलेल्या आसाराम महाराजाचे भक्त अजून काही कमी झालेले नाहीत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम महाराजावर आहे. तरीही मोठ्या पदावर असलेले काही लोक आसारामचे पाय सोडायला तयार नाहीत.
माजी मुख्य न्यायाधीश पाया पडले
जोधपूरमध्ये आज जे घडलं, ते आश्चर्यकारक होतं. सिक्किम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सुंदर नाथ भार्गव हे आसारामचे पाया पडले. जोधपूर न्यायालयाच्या आवारात ही घटना घडली.
भार्गव यांनी आसारामचे पाय धरले
शनिवारी याचप्रकरणी आसारामला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात होते. तेव्हा परिसरात उभे असलेले न्या. भार्गव यांनी मोठ्या सन्मानाने त्यांचे पाय धरले.
सुरक्षा रक्षकांनीही तेच केलं
एवढंच नाही तर, भार्गव यांच्याबरोबर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनीही पाया पडला. न्यायालयात बलात्काराच्या खटल्याची रोज सुनावणी होते. त्यामुळे आसारामला रोज न्यायालयात आणले जाते.
दर्शन घेण्यासाठी आलो - भार्गव
भार्गव यांना याप्रकरणी विचारणा केल्यानंतर त्यांनी 'आपण एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जोधपूर आल्याचे सांगितले, सुनावणीसाठी आसाराम यांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे मला कळाल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी न्यायालयात गेलो', असं भार्गव यांनी म्हटलं आहे.
काहीतरी चांगलं होणार - आसाराम
'भार्गव हे माझे भक्त असून अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. त्यांना मला भेटायचे होते. त्यासाठी ते येथे आले. न्याययंत्रणेत त्यांचा चांगला संपर्क आहे. काहीतरी चांगलं होणार', असं आसाराम बापूने म्हटले आहे.
आसारामचा मुलगा नारायण साई देखील बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात आहे.