Asaram Bapu Surat Rape Case : स्वयंघोषित अध्यत्मिक गुरु आसाराम बापूला बलात्कार प्रकरणामध्ये जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये सूरत येथे एका मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात (Surat Rape Case) गांधीनगर सेशन्स कोर्टाने आसाराम बापूला (Asaram Bapu) सोमवारी दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने यासंदर्भातील शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2013 मध्ये आसाराम बापूवर सूरतमधल्या एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. तर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर नारायण साई (Narayan Sai) याने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणात आसारामशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि इतर चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा यांनाही आरोपी ठरवण्यात आलं आहे. आसाराम कालच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे कोर्टात हजर होता. त्यानंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवलं. मात्र शिक्षेची सुनावणी कोर्टाने आजसाठी राखून ठेवली होती. 


आसाराम बापू बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जोधपूर येथील तुरुंगात तो तुरुंगवास भोगतोय. याआधी जोधपूर बलात्कार प्रकरणामध्ये आसाराम बापूच्यावतीने कोर्टात जामीनासाठी याचिका करण्यात आली होती. पण कोर्टाने ती फेटाळली.


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली होती. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे जामीन मिळावा अशी बाजू आसाराम बापूने न्यायालयासमोर मांडली होती. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली. आता सूरत प्रकरणातही कोर्टाने शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे आसाराम बापूला सध्यातरी कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. आज सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे आसारामचा तुरुंगातील मुक्का वाढणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.