मुंबई : भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाखाच्या जवळ पोहोचली आहे. मागच्या ४ दिवसांमध्ये रोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना आसाम आणि केरळ या दोन राज्यांनी कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत दिले आहेत. पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मात्र याचं खंडन केलं आहे. भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला सापडला होता. कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी हे कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत नाहीत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यात आधी आसाम सरकारने कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचा उल्लेख केला. गुवाहाटी शहरात ८ हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी ५ जुलैला राज्यात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचे संकेत दिले होते. २८ जूनपासून शहरात लॉकडाऊन असला, तरी परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जास्त टेस्टिंगची गरज आहे. लवकरच गोष्टी नियंत्रणात येतील, असा विश्वास हेमंत बिस्वा शर्मा यांनी व्यक्त केला होता. 


'आम्हाला फक्त गुवाहाटीमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त टेस्ट करायच्या आहेत. ट्रॅकिंगच परिस्थिती नियंत्रणात आणू शकेल. आत्तापर्यंत गुवाहाटीमध्ये १.१० लाख लोकांना कोरोना झाला. शहरात ३१ कोव्हिड स्क्रिनींग सेंटर आहेत,' अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली. 


केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनीही शुक्रवारी कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत दिले. अनंतपुरम जिल्हाच्या किनारपट्टी भागात कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं विजयन म्हणाले. किनारपट्टीची गाव असलेल्या पुल्लुविला आणि पूनतुरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे, अशी प्रतिक्रिया विजयन यांनी दिली. या क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणाही त्यांनी केली. केरळमध्ये तिरुवनंतपूरम कोरोनाचा सर्वाधिक प्रभावित जिल्हा आहे.