निवडणूक ड्युटीवर तैनात पोलिसाकडून साथीदारांवर गोळीबार, एक ठार
आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी सुरू आहे
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या ड्युटीवर तैनात असलेल्या एका पोलिसानं आपल्या साथीदारांवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आसाम पोलिसांच्या एका जवानानं गुरुवारी आपल्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात एका उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाले.
ही घटना पश्चिम बंगालच्या हावडा स्थित बगनानमध्ये घडलीय. आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत बर्मन हावडामध्ये निवडणुकीच्या ड्युटीवर तैनात होते. गुरुवारी सकाळी जवळपास ११.२० वाजता आसाम पोलिसांच्या सातव्या बटालियनच्या कन्व्हॉय ९६७ मध्ये तैनात जवान कॉन्स्टेबल जवान कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत बर्मन यांनी इन्सास रायफलमधून साथीदारांवर जवळपास १३ राऊंड गोळ्या फायर केल्या. या गोळीबारात सब इन्स्पेक्टर भोलानाथ दास यांचा जागीच मृत्यू झाला. तर सब इन्स्पेक्टर अनिल राजबंगसी आणि कॉन्स्टेबल रंतूमणि बोरो जखमी झाले.
या जवानानं हा गोळीबार का केला याबद्दल त्याची तपासणी सुरू आहे.