भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट
कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली : कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे. पाच पैकी चार राज्य भाजपच्या हातातून गेलीत. तर काँग्रेसने मिझोराम हातचे गमावलेय. त्यामुळे लोकसभा सेमीफायनल म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्या सेमीफायनलमध्ये भाजपला जोरदार फटका बसत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. हा धक्का इतका जोरदार बसला आहे की, येथील भाजप मुख्य कार्यालयातील शुकशुकाट दिसत आहे.
पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात उत्साह होता. तोच उत्साह आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालावरुन दिसत आहे. अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी काँग्रेसने राज्यस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेतून खाली खेचले आहे. मात्र, काँग्रेसला आपल्या हातचे छोटे राज्य मिझोराम राखता आलेले नाही. या ठिकाणी स्थानिक पक्षाने बाजी मारत भाजप आणि काँग्रेसला दे धक्का दिलाय. या ठिकाणी भाजपला दुहेरी यशही संपादन करता आलेले नाही. येथे एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. तर तेलंगणामध्ये भाजपला सत्तेतून टीआरएसने खाली खेचत आपला पाया अधिक भक्कम केलाय. या ठिकाणी निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केलाय.
मध्य प्रदेशमध्ये आपणच येणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर झालेय. २३० जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये ११६चा जादुई आकडा गाठणं सत्ताधारी भाजपला शक्य झालेले नाहीच, पण काँग्रेसही या आकड्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आलीये. दरम्यान, या ठिकाणी समाजवादी पार्टी आणि मायावतींचा बसपा काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे.
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच बघायला मिळाले. कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजपाची मुसंडी. दुपार झाली तरी या दोन कसलेल्या खेळाडूंचा सी-सॉचा खेळ सुरूच राहिला. अखेर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्याचं स्पष्ट झालंय. निकाल हाती यायला सुरूवात होताच काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे भोपाळमधल्या पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं धूमधडाक्यात स्वागत केलं. काँग्रेसची सत्ता आलीच तर कमलनाथ आणि शिंदे यांच्यातच रस्सीखेच होणार असल्यामुळे दोघांचेही कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करण्यास उत्सुक होते.
दुसरीकडे भाजप कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. असं असलं तरी पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची तातडीने बैठक बोलावली. बहुमताचा आकडा हुकल्यानंतरही सत्तास्थापनेसाठी खलबतं सुरू झाली आहेत. मध्य प्रदेशात गोवा पॅटर्न राबवून पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी शिवराजसिंह चौहानांनी केलीये. मात्र, ते सहज शक्य होण्याचे शक्यता नाही.
आता राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल आहेत. सर्वात मोठा या नात्यानं भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं. या परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टी आणि अपक्षांना महत्त्व प्राप्त झालंय. बसपा नेत्या मायावती यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं तातडीनं जाहीर केल्यामुळे आता शिवराजसिंह चौहान यांची संपूर्ण भिस्त अपक्षांवर असणार आहे.