नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत. यावरून टीका करण्याची संधी सोडतील ते विरोधक कसले... 'सोशल मीडियावर बँकॉक का ट्रेन्ड होतंय?' असा प्रश्न भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर विचारलाय. राहुल गांधी बँकॉकला निघून गेल्याची बातमी यासाठीही महत्त्वाची मानली जातेय कारण महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रचंड आंतरिक कलहाला सामोरी जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात मुंबई काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष संजय निरुपण यांनी नाराजीचा सूर छेडलाय... तर दुसरीकडे हरियाणामध्ये माजी पदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी पक्षालाच राम राम ठोकलाय. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी राहुल गांधी नवी दिल्लीहून बँकॉकसाठी रवाना झालेत ते १० ऑक्टोबरला दिल्लीत परतणार आहेत. परंतु, ऐन निवडणुकांच्या काळात राहुल गांधी बँकॉकला का निघून गेले? या प्रश्नाचं उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे. याबद्दल पक्षाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. 



उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल गांधींच्या नावाचाही समावेश आहे. पण, हा प्रचार राहुल गांधी कधी आणि कसा करणार? याबद्दल मात्र अजूनही स्पष्टता नाही. 


महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक २०१९ साठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. हरियाणामध्ये ९० जागांसाठी तर महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.