अमर काणे, झी २४ तास, नागपूर : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द व्हावं, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक दशकं प्रयत्न करत होता. केंद्र सरकारने काश्मिरातून 370 हटवल्यानंतर संघ हा आपला विजय मानतोय. आगामी निवडणुकीत भाजपाला फायदा होण्यासाठी संघ ३७० रद्द झाल्याचं हे यश लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द करणं हा प्रमुख मुद्दा होता. त्यासाठी गेली अनेक दशकं संघ सातत्याने प्रयत्न करत होता. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 आणि 35-ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. याला संघ आपल्या भूमिकेचा विजय मानतो आणि त्याचा संघाकडून व्यवस्थित प्रचारही केला जातोय.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासून कधीही थेट राजकारण केलेलं नाही. संघाच्या प्रचारकांचा भाजपाच्या पक्ष बांधणीत सिंहाचा वाटा असला तरी, थेट राजकारण करू नये हे पथ्य संघानं आजतागायत पाळले आहे.



विधानसभेच्या निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. पण गेल्या काही निवडणुकांपासून राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या घटना आणि मुद्दे विधानसभेच्या प्रचारात आवर्जुन वापरले जातात. त्यामुळे जम्मू-काश्मिरातून 370 रद्द झाल्याचा मुद्दा भाजप इन्कॅश करतंय. त्याला स्वयंसेवकांची साथ मिळत आहे.