मुंबई : Mizoram assembly elections 2018  मिझोराम विधानसभा निवडणूकांच्या सर्व चाळीस जागांचे कल हाती आले असून, यामध्ये एमएनएफ म्हणजेच मिझो नॅशनल फ्रंट २९ जागांवर आघाडीवर आहे. तर या राज्यात काँग्रेस मात्र कमालीचं पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मिझोरामचे मुख्यमंत्री ललथहनवाला यांना दक्षिण चंपाईच्या जागेवर पराभवाचा स्वीकार करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांना पराभूत करत या जागेसाठी टी.जे. ललनतलुंगा यांना मतदारांनी निवडून दिलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएनएफने या राज्यात मॅजिकल फिगर अर्थात जादूई आकडा ओलांडला आहे. तर, सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मात्र आता इथे फटका बसला आहे. २००८ पासून मिझोराममध्ये के.पी. ललथहनवाला हेच मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. 



मिझोरामचा एकंदर इतिहास पाहता गेल्या तीस वर्षापासून येथे दोनच मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळे मिझोराममध्ये सत्तापालट होण्याची स्पष्ट चिन्हं आहे. मतमोजणीतून समोर येणारे एकंदर कल पाहता एमएनएफच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाच्या कार्यालयाबाहेर मिठाई वाटणाऱ्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.


मिझोराममधील काही वर्षांपूर्वीचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहता इथे कोणत्याच पक्षाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळालेली  नाही. पण, ललथहनवाला यांनी केलेल्या दाव्यानुसार ते काँग्रेसला सत्तेत परत आणण्यात कितपत यशस्वी ठरतात हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. 


निवडणुकांच्या आधी काँग्रेसमधील बऱ्याच मोठ्या नेत्यांनी पक्षातून बाहेर पडत एमएनएफ आणि भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे याचा फटका सध्या काँग्रेसला  बसत असल्याचं दिसत आहे.