EC Announce Assemblies Election : भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांच्या वृत्तानुसार, या राज्यांमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या तारखा आणि टप्प्यांवर विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होऊ शकते. राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये गेल्यावेळेप्रमाणे एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व निवडणुकांच्या राज्यांच्या मतमोजणी एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.


मध्यप्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. तर भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) तेलंगणात सत्तेवर आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांतील निवडणुकांकडेही सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. कारण या निवडणुकांमध्ये काँग्रेससह 20 हून अधिक विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र लढत आहेत. 


मध्य प्रदेशातील 230, राजस्थानमधील 200, तेलंगणातील 119, छत्तीसगडमधील 90 आणि मिझोराममधील 40 विधानसभा जागांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. 



निवडणूक आयोगाचा दौरा


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने राजस्थान, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाचही राज्यांना भेटी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह सर्व निवडणूक राज्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून योजना अंतिम करण्यात आली आहे. आता फक्त निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायची आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाचही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.