दिवाळीच्या आधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, हालचालींना वेग
राज्यातील विधानसभा निवडणुकांवर सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : कोरोनामुळे बऱ्याच निवडणुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात अनेक महापालिकांचा कारभार सध्या प्रशासक चालवत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly election) वेळापत्रक या महिन्यात दिवाळीपूर्वी जाहीर केले जाऊ शकते. निवडणूक आयोग 15 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो. या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे, तर काँग्रेस (Congress) प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. आम आदमी पक्ष दोन्ही राज्यांमध्ये टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. या राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये मतदान होऊ शकते.
निवडणूक आयोगाने (Election commission) निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही राज्यांचा दौरा केला आहे. निवडणूक आयोग आता निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्याची तयारी करत आहे. यासाठी आयोगाच्या टीमने दोन्ही राज्यातील अनुकूल हवामान, शालेय परीक्षा, स्थानिक सण-उत्सव, शेती आणि इतर काही कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे.
साधारणपणे गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाते. पण यावेळी जम्मू-काश्मीरचा बदललेला नकाशा आणि वाढलेल्या जागांमुळे या राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रकही बदलेल, अशी अपेक्षा होती. आता अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी संकेत दिले होते की नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या उंच पर्वतीय भागात कडाक्याच्या थंडीमुळे, येथील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात.
गेल्या वेळी म्हणजे 2017 मध्ये, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेवर नजर टाकली, तर बरेच काही बदलले आहे. अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच दोन राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक वेगवेगळ्या दिवशी जाहीर करण्यात आले. त्यानंतर तब्बल 13 दिवसांनी निवडणूक जाहीर झाली. आयोगाने 12 ऑक्टोबरला सकाळी पत्रकार परिषद घेण्याची नोटीस बजावली. त्या दिवशी फक्त हिमाचल प्रदेश निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर 2017 रोजी मतदान जाहीर करण्यात आले. तर मतमोजणीची तारीख तब्बल 40 दिवसांनंतर म्हणजेच 18 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली होती.
या घोषणेनंतर 13 दिवसांनी 25 ऑक्टोबर रोजी गुजरातच्या 14 व्या विधानसभेच्या 182 जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या. हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी मतदानाच्या ठीक एक महिन्यानंतर 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबर रोजी एकाच वेळी मतमोजणी झाली.