अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला यशाचं गिफ्ट घेऊन राहुल सोनियांच्या भेटीसाठी दाखल
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय...
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांत काँग्रेसची कामगिरी चांगलीच राहिल्याचं समोर येतंय. छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवलीय... तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बहुमताच्या आसपास आहे... याच दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी दुपारी आपल्या आईच्या अर्थात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. राहुल आणि सोनिया गांधी सायंकाळी एकत्रच पत्रकारांना सामोरे जातील, असं समजतंय.
उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय... आणि या निवडणुकीत काँग्रेसनं आपली कामगिरी सुधारून दाखवलीय. गेल्यावर्षी ११ डिसेंबरला सोनिया गांधी यांच्याकडून राहुल यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती.
या निकालांमुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.