निवडणूक निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या
Assembly Election Results 2023: निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात.
Assembly Election Results 2023: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये टाकलेल्या मतांच्या निकालाची तुलना व्हीव्हीपीएटी प्रणालीच्या निकालाशीही केली जाते. दोन्हीच्या आकड्यांमध्ये फरक असेल तर EVM आणि VVPAT पैकी कोणता योग्य मानला जातो? असा प्रश्न विचारला जातो. अशावेळी आधी मते कशी मोजली जातात? याबद्दल जाणून घेऊया.
निवडणूक आयोग मतदानासाठी ईव्हीएम मशिनचा वापर करतो. ईव्हीएम मशीनमध्ये मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला त्यासमोरील बटण दाबून मतदान करतात. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर, प्रत्येक फेरीत एकावेळी केवळ 14 ईव्हीएम मशीनवर मतमोजणी केली जाते. 14 ईव्हीएम मशिनमधील मते एकाच फेरीत मोजली जातात. मोजणीनंतर निकाल जोडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ती काळ्या फळ्यावर नोंदवली जाते.
VVPAT प्रणाली
2013 पासून मतदान प्रक्रियेत व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) जोडण्यात आले. व्हीव्हीपीएटी प्रणालीमध्ये, ईव्हीएममध्ये मतदान केल्यानंतर, त्या उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्हासह एक पेपर स्लिप तयार केली जाते. त्यामुळे मतदानात पारदर्शकता येते. तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केले त्याला मत मिळाले की नाही हे ठरविले जाते. त्यामुळे मतदारांचा निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ होतो.
मतमोजणीत फरक आल्यास काय?
मतमोजणीच्या वेळी, VVPAT स्लिपचे निकाल आणि संबंधित ईव्हीएमची मते जुळतात. संकलन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक अधिकारी मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर करू शकतात. अनेकदा VVPAT स्लिप्स आणि त्यांच्या संबंधित EVM मतांचे निकाल सारखेच असतात. पण जेव्हा या निकालांमध्ये फरक असतो तेव्हा काय होते? असा प्रश्न उपस्थित राहतो.
VVPAT स्लिपचा निकाल अंतिम मानला जातो. VVPAT स्लिप्सची पडताळणी मतमोजणी हॉलमध्ये सुरक्षित VVPAT मोजणी बूथमध्ये केली जाते. या बूथमध्ये फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे व्हीव्हीपीएटी क्रमांकावर अंतिम शिक्का दिला जातो.
मतांच्या मोजणीनंतर, डेटा कंट्रोल युनिट मेमरी सिस्टममध्ये जतन केला जातो, जो हटविला जाईपर्यंत सुरक्षित राहतो. मतमोजणीची जबाबदारी रिटर्निंग ऑफिसरची असते. आणि मोजणी झालेल्या मतांची जबाबदारी रिटर्निंग ऑफिसर (RO) कडे आहे याची खात्री करणे महत्त्वाचे असते.