कोळशाच्या खाणीत अडकले कामगार, तेरा जणांचा मृत्यू ?
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे साठहून अधिक कर्मचारी असलेली दोन पथक शुक्रवारी सकाळी इथं पोहोचलीत.
मेघालय : मेघालयच्या जैतिया हिल्स इथं पाण्याने भरलेल्या कोळशाच्या खाणीत तेरा खाण कामगारांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. हे सर्व खाण कामगार १३ डिसेंबरपासून या खाणीत अडकलेत. अडकलेल्या कामगारांची जिवंत असण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलीस खाणकामगारांना वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री कॉरनार्ड संगमा यांनी सांगितलंय.
बचाव कार्य सुरू
सान गावाजवळील लॅटीन नदीचे पानी गुरुवारी गावातील खदानात घुसल्याने ही परिस्थिती निर्माण झालीय. या खाणीत पानी शिरण्यापूर्वीच पाच लोक बाहेर पडले होते. मात्र उर्वरित कामगारांबद्दल अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
ही खाण ३७० फूट खोल असून एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, ती पाण्याने ७० फूट भरलेली आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे साठहून अधिक कर्मचारी असलेली दोन पथक शुक्रवारी सकाळी इथं पोहोचलीत. तर राज्य आपत्ती निवारण पथकाचे १२ सदस्य आधीपासूनच बचाव कार्यात आहेत.