नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे तीन नव्हे तर जवळपास २० जवान शहीद झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवानांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहीद झालेल्या भारतीय जवानांमध्ये कर्नल दर्जाचा अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तर चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीवेळापूर्वीच परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकतर्फी हालचाली केल्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर काहीवेळातच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवरील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर भारत-चीन सीमेवरील लष्करी हालचालींना वेग आला आहे. या झटापटीनंतर गलवान खोऱ्याच्या परिसरात चिनी हेलिकॉप्टर्सची ये-जा मोठ्याप्रमाणाव वाढली आहे.



दरम्यान, काहीवेळापूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली.